अध्यक्ष मनोगत
विद्यार्थी व पालकांशी संवाद: “माझ्या मुलाने यशाची उत्तुंग शिखरे पार करावी; त्याचबरोबर तो आज्ञाधारक, कष्टाळू व सर्वगुणसंपन्न असावा” अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. विद्यार्थ्यांवरील संस्कार हे विद्यार्थ्यांचे आई-वडील, विद्यार्थी ज्या ठिकाणी राहतो व वाढतो तो परिसर/समाज, शाळा आणि मित्र/संगत या चार बाबींवर अवलंबून असतात.
या चारही बाबी अनुकूल असल्या तरी विद्यार्थ्यास उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी आणखी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत – विद्यार्थ्याची स्वतःची जबरदस्त इच्छाशक्ती, आणि विद्यार्थ्याने उच्च ध्येय प्राप्त करावे यासाठी तळमळ करणारे आई-वडील व शिक्षक यांची जबरदस्त इच्छाशक्ती. हे घटक अनुकूल झाले तर आयुष्यातील कितीही मोठे ध्येय विद्यार्थी गाठू शकतो.
अनेक खाजगी शाळा उपलब्ध आहेत, परंतु संस्कारांनी युक्त शाळा अभावानेच आहेत. पालकांची मनःस्थिती लक्षात घेऊन आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न विश्वात्मक ओम गुरुदेवांच्या प्रेरणेने आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या रूपाने आम्ही संघटितपणे करीत आहोत.
“आत्मसंयम, उदात्त प्रेम, परोपकार, सेवा, शिस्त, दया, आनंदस्वरूप, कल्याणकारी” हे सर्व गुण पूर्ण रूपाने प्रकट झालेल्या आत्म्याचे म्हणजेच परमेश्वराचे आहेत. विद्यार्थ्यांमधील दडलेले हे गुण पूर्ण रूपाने प्रकट करण्यासाठी मूलतः या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली आहे. सद्गुरू सांगतात, “आत्म्याचे स्वतःमधील प्रकटीकरण हे ध्यानाच्या माध्यमातून होईल व हेच ध्यान विद्यार्थी, शिक्षक यांनी संगसंगतीत केले पाहिजे.”
आपण पालक भाग्यवान आहात. समाजातील विकृतींपासून दूर आपला पाल्य आध्यात्मिक वातावरणात शिक्षण घेत आहे. आपण सर्वजण प्रार्थना करूया की ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आत्म्याचे प्रकटीकरण स्वतःच्या ठिकाणी करून जीवनातील उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्वशक्तिमान बनेल. अशी शक्ती सद्गुरू प्रदान करतील.









